उद्यापासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. याच्या पूर्वसंध्येला आज सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षांना चहापाण्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं. या चहापाण्यावर विरोधकांनी बहिष्कार घातला. याचं कारण सांगण्यासाठी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच अधिवेशनात विरोधकांकडून कोणते मुद्दे उपस्थित केले जातील, याची माहिती दिली. यावेळी त्यांनी आमदार संतोष बांगर यांच्याकडून सरकारी अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचा उल्लेख करत सरकार सडकून टीका केली. अजित पवार म्हणाले, हे सरकार येऊन काहीच दिवस झाले आहेत तरी यांच्यातील काही आमदार महाराष्ट्रात संघर्ष पेटावा अशी भाषा वापरत आहेत. शिवसेनिकांना ठोकून काढा, त्यांचे हात तोडा, हात तोडता नाही आले तर तंगडी तोडा, अरे ला का रे म्हणा, कोथळा काढा अशी भाषा वापरत आहेत, ही काय पद्धत आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्याला सुसंस्कृतपणा शिकवला काम करतानाचे संस्कार शिकवले. पण हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, भाजपला पटत का? असा सवालही त्यांनी केला.
